सातारा प्रतिनिधी । तारळी धरण उभारणीस 1995 साली मंजूरी मिळाल्यानंतर त्याचे काम 2010 साली पुर्ण झाले. या धरणामध्ये 5.83 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून त्यातील 1.83 टीएमसी पाणी नदीवाटे शेतीसाठी व पिण्यासाठी वापरात येत होते. उर्वरीत 4 टीएमसी पाणी वापरात येत नव्हते. दरम्यान, मसूर व कोपर्डे हवेली विभागातील शेतकऱ्यांनी पिकांना पाणी मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार कोपर्डी लिंक कॅनॉलमधून तारळी धरणाचे पाणी 50 क्सुसेक्सने सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दर दहा तासांनंतर पाण्याचा वेग वाढवून 235 क्यु. पाणी दुर्गळवाडी ता. कोरेगाव येथे आरफळ कालव्यात सोडुन ते मसुर विभाग व कोपर्डे हवेली विभागासाठी जाणार आहे. तारळी प्रकल्पातून आरफळ कालवा सांगली जिल्ह्याकरिता १.६७ TMC पाण्याची तरतूद आहे. तारळी धरणाचे पाणी कॅनाल मधून आरफळमध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. ऐन मार्च महिन्यामध्ये पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, तारळी धरणातून आरफळ कालव्याला जोडणाऱ्या कोपर्डे जोड कालव्याचे सुरुवातीच्या टप्यातील १७४ मी. लांबीमधील काम रखडले गेले होते. परंतु सध्यस्थितीत त्याठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आरफळ कालवा सांगली जिल्ह्याकरिता पुढील हंगामातील आवर्तन मिळणे शक्य होणार आहे.