सातारा प्रतिनिधी | सोफा, टेबल, फ्रिज आदी घरगुती साहित्याची ट्रकमधून वाहतूक करत असल्याचे भासवून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणार्या दोघांना राजगड पोलिसांनी पकडले. पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. 11) सकाळी साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 57 लाख 12 हजार 800 रुपयांचा गुटखा आणि ट्रक असा एकूण 65 लाख 19 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी इमरान अहमद अजमल खान (रा. कोळीवाडा रोड, वसई, ठाणे) व सुजित अग्रवाल (रा. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी इमरानला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधून सोफा, टेबल, फ्रिज आदी घरगुती साहित्याची वाहतूक करत असल्याचा बनाव करत गुटख्याची वाहतूक होत होती. याबाबतची माहिती महामार्ग सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार महामार्ग सुरक्षा पथक व राजगड पोलिसांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर सापळा रचला. या वेळी सातारा बाजूकडून येणार्या एमएच 03 सीव्ही 3017 क्रमांकाच्या ट्रकला अडवण्यात आले.
यावेळी पोलिसांनी सदर चालक इमरानला विचारणा केली असता त्याने एक्सपर्ट पॅकर्स अॅण्ड मुव्हर्स, यशवंतपूर, बंगलोर, कर्नाटक कंपनी व ओंमकार रमेश सिरवी यांच्या नावे असलेली बनावट पावती दाखवली. त्यावर संशय आल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 97 पोती, 4 बॅगा असा एकूण 65 लाख 19 हजार 800 किमतीचा प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू, गुटखा मिळून आला. ट्रकमालकाच्या सांगण्यावरून पुणे येथे सुजित अग्रवालला विक्रीकरिता हा मुद्देमाल घेऊन जात असल्याची त्याने कबुली दिली. ट्रकसह सर्व मुद्देमाल जप्त करून राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.