सातारा प्रतिनिधी | विजापूरहून सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याकडे नेण्यात येणाऱ्या अवैध सुगंधीत तंबाखु, पानमसाला आणि गुटख्याचा ५१ पोत्यांचा सुमारे १३ लाख ६५ हजाराचा साठा विटा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित चारचाकी गाडीसह चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम (वय २२, रा. दारुज ता.खटाव, जि. सातारा) यास विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्यांच्याकडील मुद्देमालासह गाडीही जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुहागर ते विजापूर मार्गावर विजापूरकडुन एक बुलेरो पिकअप गाडी विट्याच्या दिशेला बुधवारी अवैध रित्या गुटखा वाहतुक करत आहे, अशी माहिती विटा पोलिसांना मिळाली. त्यावर विटा पोलिसांचे पथक तयार करून भिवघाट (ता.खानापूर) येथे रवाना झाले. तेथे जावून पथकाने सापळा रचला असता, सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक बुलेरो पिकअप गाडी येत असल्याचे दिसली. त्यास इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितले असता तो तेथून तडक निघून गेला.
त्याचा पाठलाग करून पिकअप गाडी (नं एम.एच. ११डी.डी ४३९०) पकडले. त्यातील गाडीच्या पाठीमागील हौदयात द्राक्ष भरण्याचे कॅरेट मध्ये बेकायदेशीरपणे १३ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा विमल गुटखा असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी विमल गुटखा आणि बलेरो गाडीसह एकूण २० लाख ६५ हजार रुपये रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला तर संबंधित चालक ऋषिकेश कदम यास अटक करण्यात आली आहे.