सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात कराड, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात डोंगरी भागात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशावेळी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे मदतकार्य पोहचवले जाते. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सध्या दरडप्रवण क्षेत्र असलेल्या तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मागर्दर्शन केले जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील संभाव्य दरडप्रवण व पूरप्रवण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकूण ३७ गावांमध्ये आवश्यक असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत नुकतेच प्रशासनाकडून प्रशिक्षण देण्यात आले.
महाबळेश्वर येथील मध संचालनालयाच्या येथील सभागृहात तहसीलदार तथा अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तेजस्विनी खोचरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दरडप्रवण व पूरप्रवण गावातील सर्व मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, आपदा मित्र, अशासकीय संस्थेचे स्वयंसेवक युवक व इतर ग्रामस्थ यांचा नुकताच प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी यशदा पुणे येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षक यांनी प्रशिक्षण दिले.
यावेळी दरड कोसळून किंवा अचानक पूर आल्यावर शोध व बचाव पथक, शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोचण्यापूर्वी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी गावपातळीवरील समिती तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, युवक मंडळातील सदस्य, अशासकीय संस्थांच्या सदस्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे व दरडी कोसळण्यापूर्वी निसर्गाकडून प्राप्त झालेले संकेत ओळखणे तसेच गावस्तरीय शोध व बचावासाठी वितरित केलेले साहित्य वापराबाबत माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणामध्ये दरडप्रवण पूरप्रवण भागामध्ये दरडी व कोसळण्याच्या अनुषंगाने पूर्वसंकेत ओळखणे तसेच आवश्यक त्या खबरदारीच्या उपायोजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार तसेच गॅस गळती होणे, आग लागणे याबाबत तातडीचे करावयाच्या उपाययोजनेचे प्रशिक्षण व अपघातग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रशिक्षणाचे नियोजन विनोद सावंत, नायब तहसीलदार व तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले.