सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शिवतीर्थ येथील पोवई नाक्याच्या चौकाला लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याच्या घाट घातला जात आहे. यादरम्यान राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेत मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत तक्रार केली आहे. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे आजोबा बाळासाहेब देसाई यांनीच त्याठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारून शिवतीर्थ हे नाव दिले आहे, त्यामुळे या ठिकाणी परिसरात सुशोभीकरण करून तर आयलँड उभारणार असू तर त्याला कोणी विरोध करण्याचे काम नाही, असे देसाई यांनी म्हंटले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवतिर्थाचे नाव बदलून दुसरं कोण नाव देणं हे माझ्या मनातही नाही. माध्यमांनी याचा विपर्यास केलाय. जस राजघराण्याला शिवरायांबद्दल आदर आहे तसाच आदर आम्हालाही आहे. परंतु दुसऱ्या मोकळ्या जागेत बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आम्ही आयलंड तयार करून त्याचे सुशोभीकरण करून नवीन काय काम करत असू तर त्याला कोणी विरोध करू नये.
साताऱ्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पोवई नाका परिसरात पूर्वी एक जुना आयलॅन्ड होता. भुयारी मार्गाच्या कामामुळे ते आयलॅन्ड काढण्यात आले. त्या मोकळ्या जागेत एक आयलॅन्ड तयार करणे तसेच सुशोभीकरण करणे आदीविषय प्रस्तावित आहे. पालकमंत्री म्हणून ते मला अधिकार आहेत. शिवतीर्थाचं नाव बदलून दुसरं कुठलं तरी नाव देणं हे माझ्या सारख्या तरी कार्यकर्त्याच्या मनात येणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. राजघराण्याला ज्या पध्दतीने राजघराणे म्हणून आदर आहे, तसाच आदर छत्रपतींचे मावळे म्हणून आम्हालाही आहे. या गोष्टीचा विपर्यास करण्यात आला आहे.