पाटण प्रतिनिधी । मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास राज्यभरातून मराठा समाज बांधवांकडून पाठींबा जात आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात देखील साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा साखळी उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांनी राज्य सरकारला दिला आहे.
पाटण येथे बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नवीन एसटी स्टँड परिसरात नवीन पंचायत समिती समोर चापोली रोड येथे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साखळी उपोषणास सुरुवात केली. अंतरवाली सराटी येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली असताना त्यांना पाटण तालुक्यातील मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे.
यावेळी आरक्षण संदर्भात मराठा समाजाची वाताहत होत असल्याबाबत अनेक मराठा बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. सरकारने मराठा समाजाचा संयम पाहिला आहे. आता अंत पाहू नये, असे ठणकावून यावेळी समाजबांधवानी सांगितले.
पाटण तालुक्यातील ‘या’ गावात नेत्यांना गावबंदी
चुलीत गेले नेते.. चुलीत गेले पक्ष.. मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष अशा आशयाचे बोर्ड लावत पाटण तालुक्यातील नेरळे, तामकणे, येराड, बनपेठ, साखरी या गावात नेत्यांना गावबंदी केली आहे. मात्र, काही गावात युवकांवर राजकीय दबाव आणून आपल्या गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत. विकास कामात आपल्या गावाला झुकते माप मिळत आहे. मग नेत्यांना गावबंदी का करता..? असे सांगितले जात आहे. यावर युवक पण हुशारीने उत्तर देत विकास कामे शासन करत आहे. विकास कामे नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. कामे केली म्हणजे काही उपकार केले नाहीत. आम्ही पण त्यांना पोत्यांनी मत दिली आहेत. तुम्ही आरक्षण द्या नाहीतर नेत्यांना सांगून आम्हाला नोकऱ्या द्या असे ठणकावून सांगितले जात आहे.