सातारा प्रतिनिधी | नंदुरबारचे रहिवासी आणि अहमदाबाद येथे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईक अशा एकूण १३ जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावच खरेदी केल्याचा प्रकार घडला आहे. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.
कांदाटी खोऱ्यातील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतेच दिले आहे. यासाठी त्यांनी वाईच्या प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक देखील केली आहे.
त्यानुसार संबंधित सर्कल आणि तलाठी यांनी गुरूवारी पंचनामे केले असून, शुक्रवारी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे व्यवहार झाले आहेत, त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. यानंतर या संपूर्ण व्यवहाराबाबतचा अहवाल प्रांताधिकारी यांच्याकडे येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी पुढील निर्णय घेणार आहेत.