GST मुख्य आयुक्तांच्या अनधिकृत बांधकामाचा अहवाल सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अहमदाबादचे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईक अशा एकूण १३ जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावच खरेदी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून आयुक्तांनी ६४० एकर भूखंड खरेदी करून त्यामधील ३५ एकरावर अनधिकृतपणे केलेले बांधकाम, बेकायदा उत्खनन, खाणकाम, वन्यजीव व वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सोमवारी अहवाल सादर केला आहे. याप्रकरणी डुडी संबंधितांवर कोणती कारवाई करणार? हे पहावे लागणार आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथे चंद्रकांत वळवी यांच्या रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असतानाही त्याठिकाणी खोदकाम, खाणकाम, रस्ते आदी कामे केली असून, वनसंपदा व वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास १० जूनपासून उपोषण करणार असल्याचा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत वाई प्रांताधिकाऱ्यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले. वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी झाडाणीप्रकरणी महाबळेश्वर तहसीलदारांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. महाबळेश्वर तहसीलदारांनी सादर केलेला अहवाल वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. झाडाणी येथील गैरप्रकाराने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.