कराड प्रतिनिधी | प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील गटसचिवांकडून कराड येथील प्रीतिसंगमबाहेर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले होते. भर पावसात सुरू असलेल्या आंदोलकांना पुण्यात सहकार विभागासोबत आज बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
महाराष्ट्र सहकारी गटसचिव व कर्मचारी संघटनेतर्फे वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी सोमवारपासून येथील प्रीतिसंगमावर आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात विदर्भ व मराठवाड्यातील गटसचिव सहभागी झाले होते. त्यांच्या आंदोलनाची सहकार खात्याने दखल घेत आंदोलकांना विशेष निबंधक सहकारी संस्थेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर यांनी लेखी उत्तर दिले.
सेवा सहकारी संस्थेवर कार्यरत गट सचिवांच्या थकीत व नियमित वेतनासाठी तत्काळ निधी मंजूर करावा, गट सचिवांना ग्रामसेवकांसमान अद्ययावत वेतन श्रेणी लागू करावी, सेवा सहकारी संस्थेचे मागील पाच वर्षांपासूनचे थकीत देय असणारे सक्षमीकरण अनुदान तत्काळ अदा करावे, संस्था नियुक्त सचिवांचे सेवा नियम व वेतन निश्चित करून समायोजन करावे, आदी महत्वाच्या चार मागण्यासाठी गट सचिवांकडून बेमुदत आंदोलन करण्यात आले आहे.