कराड प्रतिनिधी । जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय,कराडच्या वतीने चांद्रयान-3 मोहिमेस मिळालेल्या सफलतेचे स्वागत करुन विद्यार्थ्यांनी इस्रोतील वैज्ञानिकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. विद्यार्थांनी चंद्र, चांद्रयान-3 व इस्रो या अवकाश प्रक्षेपण केंद्राची प्रतिकृती व राष्ट्रध्वज साकारून ‘NOW INDIA ON MOON’ असे दर्शविले. याप्रसंगी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेच्या संपूर्ण माहितीसह विद्यार्थांनी केलेल्या रचनेची माहिती समन्वयक विजय कुलकर्णी यांनी दिली.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत व्हावा, यातून प्रेरणा घेवून भविष्यात विद्यार्थांनीही संशोधक-वैज्ञानिक होऊन भारताच्या दैदिप्यमान जडणघडणीत योगदान द्यावे अशी आशा व्यक्त करण्यात आली. शाळेच्या वतीने इस्रोतील सर्व वैज्ञानिकांना अभिवादन करून व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. विद्यार्थांनी या प्रसंगी भारतमाता की जय, वंदे मातरम्, जय जवान – जय किसान – जय विज्ञान अश्या गगनभेदी घोषणा दिल्या. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. रुपाली तोडकर, सौ सोनाली जोशी यांनी प्रेरणा दिली. तसेच श्री.विजय कुलकर्णी, सौ.गौरी साळुंखे व श्री.दीपक पाटील व इयत्ता ९ वी च्या विद्यार्थांनी नियोजनपूर्वक परिश्रम घेतले.
दरम्यान, चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर संपूर्ण जगात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. सध्या भारताचे विक्रम लँडर चंद्राचा संपूर्ण अभ्यास, तेथील तापमान, माती परीक्षण याबाबतची माहिती जाणून घेत आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने हा आनंद साजरा करण्यात येत आहे.