कराड प्रतिनिधी । ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात लाभ देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा आपला मानस असल्याचे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांनी म्हंटले.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष दामले यांनी आज कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास भेट देत अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.सोनल भोसेकर, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, गौरीताई निलाखे, विनिता पेंढारकर, शरयु माटे सुषमा काळे आदी उपस्थित होते.
यावेळी आशिष दामले म्हणाले की, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना इतर समाज घटकांप्रमाणे ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व्हावी ही अनेक वर्षाची ब्राह्मण समाजाची मागणी होती. युती सरकारने आमच्या मागणीला न्याय देत महामंडळाची स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात ताकद देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा माझा मानस आहे.