नायगावातील धरणात पोहायला गेलेल्या आजोबा- नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील धरण क्रमांक २ मध्ये पोहायला गेलेल्या मावस आजोबा- नातवाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. रुद्र प्रशांत चव्हाण (वय ८, रा.जांभुळवाडी कात्रज) व प्रशांत शाम थिटे (वय ५०, रा. लक्ष्मी नगर पुणे) अशी नातू व आजोबाची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नायगाव, ता. खंडाळा या गावच्या यात्रेनिमित्त प्रशांत थिटे व रुद्र चव्हाण हे नायगाव येथे आले होते. शनिवारी 11. 30 च्या सुमारास प्रशांत थिटे हे मुलगा प्रेम थिटे व चुलत भावाचा नातू रुद्र चव्हाण व आणखी दोघांना घेऊन नायगावच्या धरण क्रमांक दोन येथे पोहायला गेले. धरणावर पोहोचताच काही समजण्याच्या आतच रुद्र याने पाण्याकडे धाव घेतली.

पाण्यात 25 ते 30 फुटावर गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने रुद्र पाण्यात बुडू लागला. हे दृश्य पाहताच रुद्रचे मावस आजोबा प्रशांत थिटे यांनी देखील पाण्याकडे धाव घेतली. व ते देखील रुद्र पाठोपाठ पाण्यात गेले. प्रशांत थिटे यांना देखील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते देखील पाण्यात बुडू लागले.समोर घडत असलेली घटना समजण्याच्या आतच दोघेही पाण्यात बुडाले होते. हे पाहून प्रेम याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. काही अंतरावर बकरी चालण्यासाठी आलेल्या महिलेने प्रेमचा आरडाओरडा ऐकून त्या ठिकाणी धाव घेतली. व त्यानंतर त्या महिलेने आजूबाजूला असणाऱ्या ग्रामस्थांना हाक मारून बोलवले.

मात्र धरणावर पोहण्यासाठी आलेले सर्वजण स्थानिक नसल्यामुळे नेमकं कोण बुडाले आहे हे कोणालाच समजत नव्हते. त्यामुळे तिथे आलेल्या स्थानिकांनी प्रेम याला दुचाकीवरून गावात आणले. त्यावेळी गावच्या पारावर बसलेल्या सर्वांनी धरणाकडे धाव घेतली. व काहींनी संबंधित नातेवाईक हे नक्की कोणाचे नातेवाईक आहेत त्याची ओळख पटवली.

घटनास्थळी पोचणाऱ्या गावकऱ्यांनी बुडलेल्यांची शोधाशोध सुरू केली होती मात्र त्याआधीच तासभर आजोबा नातवाचा बुडून मृत्यू झाला होता. नायगाव व वडगाव मधील तरुणांनी त्या दोघांचा मृतदेह अवघ्या अर्ध्या तासात शोधून बाहेर काढला. त्यानंतर त्या दोघांचे मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून शवविच्छेदन करून त्यांनतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.