सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर वसुली निम्म्यावरच; ‘इतके’ टक्के झाली वसुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील १ हजार ४९६ ग्रामपंचायतींच्या मागील थकित आणि यंदाच्या अशा एकूण १४४ कोटी ९७ लाख ७३ हजार २६ रुपये कर वसुलीपैकी यंदा फक्त ७८ कोटी ३३ लाख ५० हजार ४९६ रुपयेच वसुल झाले आहेत. त्याची सरासरी ५६ टक्क्यांवरच आहे.

सातारा जिल्ह्यातील गावे एक हजार ४९६ आणि विस्तार अधिकारी फक्त ४२ अशी स्थिती आहे. त्यातच तीन ते चार ग्रामपंचायतीचा कारभार एका ग्रामसेवकांकडे आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचाही फटका ग्रामपंचायत कर वसुलीला बसला आहे. पंचायत समितीची यंत्रणाही लोकसभा निवडणूक कामात गुंतली आहे. त्याचाही परिणाम ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर झाला आहे.

जिल्ह्यात एक हजार ४९६ ग्रामपंचायती आहेत. त्यांची मागील वर्षाची कराची थकबाकी ४८ कोटी २० लाख ९९ हजार ७०५ रुपये आहे. तर यंदाची वसुलीची रक्कम ९६ कोटी ७८ लाख ८८ हजार ८३१ रुपये आहे. त्यानुसार एकूण वसुलीची रक्कम १४४ कोटी ९७ लाख ७३ हजार २६ रुपये आहे. त्यातील फक्त ७८ कोटी ३३ लाख ५० हजार ४९६ वसुल झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ६६ कोटी ६४ लाख २२ हजार ५२७ रुपये वसूल करावे लागतील.

तालुका ग्रामपंचायती कर वसुली (टक्के)

सातारा तालुक्यात १९२ ग्रामपंचायतींची ५०.३६ टक्के, कोरेगाव तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींची ४०.५९ टक्के, खटाव तालुक्यात १३४ ग्रामपंचायतींची ५६.२७ टक्क, माण तालुक्यात ९५ ग्रामपंचायतींची ५४.१४ टक्के, फलटण तालुक्यात १३१ ग्राम पंचायतींची ४९.६४ टक्के, खंडाळा तालुक्यात ६३ ग्राम पंचायतींची ५६.२७ टक्के, वाई तालुक्यातील ९९ ग्राम पंचायतींची ५५.४२ टक्के, जावळी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीची ६८.७२ टक्के, महाबळेश्‍वर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींची ५७.७९ टक्के, कराड तालुक्यातील २०१ ग्रामपंचायतींची ५८.५१ टक्के, पाटण तालुक्यातील २३२ ग्रामपंचायतींची ५४.९१ टक्के अशी एकूण १४९६ ग्राम पंचायतींची ५४.०३ टक्के करवसुली बाकी आहे.