ट्रॅक्टरखाली सापडून ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू; कोरेगावमध्ये रात्रीच्यावेळी घडली दुर्घटना

0
7

सातारा प्रतिनिधी | हार्वेस्टरद्वारे तोडलेला ऊस पाठीमागून गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून एका ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतशील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबवडे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथे घडली आहे. अरुण धर्माजी जाधव (वय ५१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद मंगळवारी रात्री उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार रात्री साडेआठच्या सुमारास अंबवडे संमत कोरेगावच्या डोंगर नावाच्या शिवारात किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासाठी अरुण जाधव यांच्या शेतातील उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे गतीने सुरू होती. ही तोडणी सुरू असताना या हार्वेस्टरद्वारे तोडलेल्या उसाच्या कांड्या एका ट्रॅक्टरद्वारे गोळा करून ट्रॉली भरली जात होती.

लगतच अंधारात अरुण जाधव हे इतर कांड्याही वेचत होते. हे काम सुरू असताना अचानक कांड्या गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरखाली ते सापडल्यामुळे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने कोरेगाव येथे एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. तेथून त्यांना सातारा सर्वसाधारण रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत येथील पोलिसात झालेली नव्हती. मृत पावलेले अरुण जाधव हे अंबवडे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते. प्रगतशील शेतकरी आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंबवडे संमत कोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.