सातारा प्रतिनिधी । पावसाने यंदाच्या वर्षी ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली असताना मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने धरण आणि छोट्या-मोठ्या जलाशयांतील गाळ काढण्याची मोहिमी हाती घेतली आहे. त्यानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यतेतून ११.८४ लाख घनमीटर आणि लोकसहभागातून ४.५० लाख घनमीटर गाळ असा तब्बल १६ लाख ३४ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील १५४ ठिकाणी शासनाकडून कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील असलेले तलाव आणि विहिरींमध्ये वर्षानुवर्षे गाळ साचून राहिल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. हा गाळ काढण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाच्या वतीने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना सुरू करण्यात आली. गतवर्षी मान्सूनने हात आखडता घेतल्यामुळे अनेक धरणांतील पाणीपातळी तळाला गेली.त्यामुळे उन्हाळ्याच्या दोन महिन्यांत मृद व जलसंधारण विभागाने गाळ काढण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवली. यामध्ये जिल्ह्यातील छोट्या- मोठ्या धरण, तलाव, विहिरी अशा १५० हून अधिक ठिकाणी गाळ काढण्यात आला. यात प्रशासकीय मान्यतेने ११.८४ लाख तर लोकसहभागातून समतो साडेचार लाख घनमीटर असा १६ लाख ३४ हजार घनमीटर गाळ बाहेर काढला आहे.
कोयनेतील २१ ठिकाणी गाळसाठा काढण्यात येणार
कोयना धरणातील दरे तांब, बामणोली, दाभे, देवळी, आणि झांजवड, वाघळी, तेटली, मजरे शेंबडी (२ ठिकाणी), शेंबडी (दोन ठिकाणी), मुनावळे (दोन ठिकाणी), रामेघर, शिवार सावरी, वेंगाळे, गोगावे, कुरोशी, खम्बील चोरगे, वानवली, आटेगाव, लखवड अशा ठिकाणी गाळ काढण्याच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यातील दरे तांब, मुनावळे, झांजवड, दाभे येथील कामे प्रगतिपथावर आहेत.