राज्यपाल रमेश बैस पाच दिवसाच्या महाबळेश्‍वर दौऱ्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस उद्या मंगळवारपासून (दि. २१) पाच दिवस सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर दौऱ्यावर येत आहेत. राजभवन येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या गिरिदर्शन या बंगल्यामध्ये ते मुक्कामी राहणार असून या दौऱ्यात ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरासह बेल एअर रुग्णालय तसेच प्रेक्षणीय स्थळांनाही ते भेटी देणार आहेत.

दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांच्या पाच दिवसांचा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पालिका प्रशासक योगेश पाटील व पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी वेण्णा लेक व परिसरात पाहणी करून वाहतूक व्यवस्थेचा नुकताच आढावा घेतला. दि. 22 मे रोजी दुपारी 3 वाजता राजभवन महाबळेश्वर येथे राज्यपाल बैस हे इंडियन रेडक्रॉस सोसायटी स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेणार आहेत. दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे रुग्णालयाची पहाणी. सायंकाळी 5.10 राजभवन येथे आगमन व राखीव.

दि. 23 मे रोजी सकाळी 10.15 वाजता श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर येथे आगमन व दर्शन पूजेसाठी राखीव. 11.15 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अधिकाऱ्यांशी बैठक. दुपारी 3.30 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा. दि. 24 मे रोजी दुपारी 2.30 वाजता मधाचे गाव मांघर ता. महाबळेश्वर येथे आगमन व पहाणी. दुपारी 3.10 वाजता राजभवाकडे मोटारीने प्रयाण. त्यानंतर दि. 25 मे रोजी दुपारी 12 वाजता राजभवन येथून मोटारीने पाचगणीकडे प्रयाण. 12.30 न्यु ईरा हायस्कूल पाचगणी येथे आगमन व हेलीकॉप्टरने राजभवन मुंबईकडे प्रयाण, असा राज्यपालांचा दौरा आहे.

राज्यपालांच्या महाबळेश्वर दौऱ्याची नेमकी काय आहे प्रथा?

महाराष्ट्राचे राज्यपाल कोणीही झाल्यास त्यांनी मे महिन्यात आपल्या लवाजम्यासह महाबळेश्वर येथील राजभवनात येण्याची एक प्रथा आहे. मे महिन्याच्या उन्हाळी हंगामात राज्यपालांची आपल्या कुटुंब व लवाजम्यासह महाबळेश्वर येथे येण्याची ब्रिटिशकाळापासून प्रथा आहे. यापूर्वी देखील अनेक राज्यपाल उन्हाळी हंगामामध्ये चार- पाच दिवसांसाठी महाबळेश्वर मुक्कामी येत असत. सध्याचे राज्यपाल रमेश बैस देखील मागील वर्षी आपल्या कुटुंबासह येथे आले होते. यंदा देखील दि. २१ मे पासून २५ मेपर्यंत राज्यपालांचा महाबळेश्वर दौरा असणार असून जिल्हा प्रशासनाकडून याची तयारी सुरु आहे येतील राजभवनात त्याअनुषंगाने युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आक आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पालिका प्रशासक योगेश पाटील व पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी राज्यपाल दौरा व उन्हाळी हंगामामध्ये होणारी वाहतूक कोंडी या अनुषंगाने वेण्णा लेक परिसराची पाहणी करून गरज असेल त्या ठिकाणी बॅरिगेटस उभारणीसह वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत सूचना केल्या. यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, एम. आर. धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.