सातारा प्रतिनिधी । कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्या प्रस्तावाची प्रत राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात यावी. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.
महाबळेश्वर येथील राजभवनात राज्यपाल बैस यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाज, अडीअडचणी याबाबत नुकताच आढावा घेतला. यावेळी राज्यपाल महोदयांच्या सहसचिव श्वेता सिंघल, विद्यापिठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डी.टी. शिर्के, कुल सचिव डॉ. विजय कुंभार, उपसचिव रविंद्र धुरजड आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, रयत शिक्षण संस्था ही देशातील अत्यंत जुनी व मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत जवळपास साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या समूह विद्यापीठाला शासनाने मंजुरी दिली असून समूह विद्यापीठांना मंजुरी देत असताना शासनाचे जे धोरण होते त्या प्रमाणे आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून उपलब्ध व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
या आढावा बैठकीत त्यांनी विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असणाऱ्या करिअर ओरिएंटेड उपक्रम, स्किल ओरिएंटेड उपक्रम, त्यातून विद्यार्थ्यांना निर्माण होत असलेला रोजगार, नोकऱ्या यांचाही आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेमार्फत बेळगाव मध्ये चालविण्यात येत असणाऱ्या शाळांबद्दलही राज्यपाल श्री. बैस यांनी जाणून घेतले.