सातारा प्रतिनिधी | वाई विधानसभा मतदारसंघात चुरशीने झालेल्या मतदानानंतर शनिवार, दि. २३ रोजी प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता जय्यत तयारी केली आहे. वाई येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक ५ येथे टपाली व ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणीसाठी एकूण २९ टेबलद्वारे ४७१ मतदान केंद्रांच्या मोजणीसाठी २४ फेऱ्यांद्वारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याकरिता प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती वाई प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
वाई विधानसभा मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे उ वाई येथील गोदामामध्ये सीलबंद करून ठेवण्यात आली असून, याठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण भागात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवण्यात आली आहे.
या मतमोजणीकरिता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, निवडणूक आयोगाचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती वाई विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे. यामध्ये ईव्हीएम मतदान यंत्रांच्या मतमोजणीसाठी एकूण २० टेबल्स ठेवण्यात आली असून, टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी ६ टेबल आणि सैनिकी मतदार यांच्या मतपत्रिकांसाठी एकूण ३ टेबल ठेवण्यात आलीयू असून, एकूण २९ टेबलांद्वारे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
या अनुषंगाने उमेदवारांनी प्रत्येक टेबलनिहाय एक मतमोजणी प्रतिनिधी म्हणजेच प्रत्येकी एका उमेदवाराला एकूण २९ मतमोजणी प्रतिनिधी देता येतील. यासाठी प्रशासनाकडे विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत दोन छायाचित्र वाई येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करण्यात यावीत. संबंधित मतमोजणी प्रतिनिधींना प्रशासनाकडून अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. मतमोजणीच्या ठिकाणी ओळखपत्राशिवाय मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार नाही तसेच मतमोजणी सभागृहात मोबाईल आणण्यास मनाई आहे. प्रत्येक फेरीमध्ये एकूण २० मतदान यंत्रांद्वारे (सीयू) मतमोजणी होणार आहे.