सातारा प्रतिनिधी | शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठीचा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. नवीन पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर मिळू शकणार आहे.
यापूर्वी नव्याने पीककर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीककर्ज संबंधित बँक शाखेकडून दिले जायचे; परंतु आता मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाल्यामुळे बँकांना आता मुद्रांक शुल्क न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागणार आहे.
विकास सेवा सोसायटीतून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ५०० रुपयांचा स्टॅम्प द्यावा लागत नव्हता. मात्र राष्ट्रीय बँकांमधून पीककर्ज घेणाऱ्यांना तो द्यावा लागत होता. शासनाच्या महसूल व वन विभागाकडून राजपत्र प्रसिद्घ केल्याने पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांना स्टॅम्प द्यावा लागणार नाही.
या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून बँकांना दिले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बँकेत गेल्यावर कर्जासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. नोंदणी व मुद्रांक विभागाकडून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पीककर्जावरील खर्च कमी होऊन दिलासा मिळाला आहे.