सातारा प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्याकडे निवेदनद्वारेकेली असल्याची माहिती विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयूसीसी) सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सांगली, कराड, भिलवडी, ताकारी, किर्लोस्करवाडी, सातारा याठिकाणी मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा या नद्या ओसंडून वाहत आहेत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी ३९ फूट तर मिरजेत ५० फूट आहे. सातारा, कराडपासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोयना धरणातून आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली सातारा जिल्ह्यातील बरेच पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
सांगली विभागातील ८२५ एसटी बसेस रद्द केल्या आहेत. सातारा व कराड येथूनही अनेक एसटी बसेस रद्द केल्या आहेत. सातारा, कराड, सांगली ते कर्नाटक बसेस तसेच सांगली ते पुणे बसेस रद्द झाल्या आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टदरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बेळगाव-मिरज विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे गेलेले कर्नाटकातील पर्यटक मिरज जंक्शनपर्यंत १८० कि.मी. अंतरावर जाऊन ही विशेष गाडी पकडू शकत नाहीत.
बेळगावी-सातारा विशेष रेल्वे चालवून मध्य रेल्वेने लोकांना मदत करावी
सातारा ते बेळगावी थेट गाडी हवी. प्रत्येक वेळी सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, भिलवडीच्या लोकांनी मिरजेत येऊनच कर्नाटक जाणारी रेल्वे पकडावी, असा आग्रह मध्य रेल्वे करते. त्यामुळे खूप गैरसोय होत आहे. बसेस पुरामुळे धावत नसल्याने आणि लोक अडकून पडल्यामुळे बेळगावी-मिरज पूर विशेष गाडी सातारा स्थानकापर्यंत वाढवावी. नैसर्गिक आपत्तीच्या काळात दक्षिण पश्चिम रेल्वे लोकांना मदत करत आहे. बेळगावी-सातारा विशेष रेल्वे चालवून मध्य रेल्वेने लोकांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले असल्याचे सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.