कराड प्रतिनिधी । सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंती निमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचा ‘गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023’ या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी आगरकरांचे जन्मगाव टेंभू, ता. कराड येथे सिक्कीमचे माजी राज्यपाल, खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पत्रकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधारक शिक्षण संस्था टेंभूचे सचिव प्रकाश पाटील हे होते. तहसीलदार विजय पवार, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभू गावचे सरपंच युवराज भोईटे, इंद्रधनू फाऊंडेशन चे विस्वस्त नितीन ढापरे, विकास भोसले, माणिक डोंगरे, प्रमोद तोडकर, संदिप चेनगे, अशोक मोहने, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, आगरकरांनी समाज सुधारणेसाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन लोकमान्य टिळकांची संगत सोडली. आज समाजात आगरकर यांच्या सारखे असंख्य समाज सुधारक तयार होण्याची गरज आहे. इंद्रधनु म्हणजे सप्तरंग या सप्तरंगानी आगरकरांचे समाजसुधारणेचे कार्य व त्याची प्रेरणा समाजात पुढे चालू ठेवली हा एक आदर्श आहे. सध्या आगरकर व टिळकांसारखी निर्भीड पत्रकारिता करणे गरजेचे आहे.
संपादक वसंत भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात आगरकरासारखी अनेक व्यक्तीमत्व घडली. जिल्ह्याला राजकीय व सामाजिक दृष्ट्या मोठा इतिहास आहे. साताऱ्याने देशाला अनेक मोठे लोकप्रतिनिधी दिले स्वातंत्र्य चळवळीची नांदी ही याच जिल्ह्यात झाली.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्या पर्यंतचे लोकप्रतिनिधी याच जिल्ह्यातील आहेत हे या जिल्ह्याचे भाग्य आहे.
यावेळी उद्योजक रामकृष्ण वेताळ, बाळकृष्ण आंबेकर, अशोकराव थोरात यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद तोडकर यांनी केले. तर माणिक डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांचा गौरव
यावेळी सुधारककार गोपाळ गणेश आगरकर सुधारक पुरस्कार 2023 या राज्यस्तरीय पुरस्काराने कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंत भोसले, पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणीस, सातारचे ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण आंबेकर, सोलापूर येथील सांगोलानगरीचे संपादक सतिश सावंत, वृत्तनिवेदीका स्वाती गोडसे यांचा सन्मान करण्यात आला. तर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे उपाध्यक्ष, शेतीमित्र अशोकराव थोरात यांना प्रदान करण्यात आला. पेंच टायगर रिझर्व्ह स्पेस नागपूर येथे अल्प काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आरएफओ मंगेश ताटे व अधिस्विकृती पुणे विभागीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गोरख तावरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.