कराडमध्ये भर वस्तीतील बंगल्यात धाडसी चोरी, खिडकीचे गज कापून 38 लाखांचे दागिने लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड– शहरातील भर वस्तीत धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी स्टेडियम नजीकच्या हौसिंग सोसायटीतील बंगल्यातून चोरट्यांनी 38 लाखांचे दागिने लंपास (Gold Robbery In Karad) केले आहेत. त्यात हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. या घटनेमुळे कराड शहरात (Karad City) एकच खळबळ उडाली आहे. बंगल्याच्या खिडकीचे गज कापूस चोरटे बंगल्यात घुसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

याबाबत नरेंद्र वसंतराव जानुगडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी स्टेडियमनजीकच्या शिवाजी हाऊसिंग सोसायटीत फिर्यादी नरेंद्र जानुगडे यांचा बंगला आहे. ३० मार्चपासून जानुगडे कुटुंब कामानिमित्त बंगळुरूला गेले होते. जाताना बंगल्याला कुलूप लावून सर्व दरवाजे, खिडक्या बंद केल्या होत्या. सोमवारी रात्री जानुगडे कुटुंबीय कराडात आले. त्यावेळी बंगल्याचा दरवाजा कटविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. तसेच दरवाजाशेजारील खिडकी उचकटण्यात आली होती. खिडकीचे दोन गज कापण्यात आले होते.

जानुगडे कटुंबियांनी बंगल्यात जाऊन पाहिले असता कपाटातील सोने आणि हिऱ्याचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे जानुगडे कुटुंबीयांना जबर धक्का बसला. त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिली.