पाटण प्रतिनिधी | भरदिवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जनावरांच्या कळपातील शेळी ठार झाली. पाटण तालुक्यातील महिंद धरणाच्या परिसरात गुरुवारी ही घटना घडली. चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे महिंद परिसरात सध्या बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, मृत शेळी घेऊन जाताना बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
महिंद धरणाच्या परिसरातील सदुवर्पेवाडी येथील सुभाष सखाराम शेलार यांच्यासह लक्ष्मण सावंत, यश कदम, आशिष कदम या शेतकऱ्यांनी गावाजवळच्या उकळी नावाच्या शिवारात जनावरांचा कळप चरायला सोडला होता. कळपापासून काही अंतरावर ते बसले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपात घुसून शेळीवर हल्ला चढवला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे कळपातील म्हशी व शेळ्या सैरावैरा पळू लागल्या. त्यामुळे बिबट्याने पलायन केले.
जनावरे सैरावैरा पळत सुटल्याने शेतकऱ्यांनी धाव घेतली असता एक शेळी मृत्युमुखी पडल्याचे दिसले. परंतु नेमका कोणत्या प्राण्याने शेळीवर हल्ला केलाय, हे कळण्यासाठी त्यांनी जवळच झाडावर दोन मोबाईल बांधून शेळी पडलेल्या ठिकाणावर मोबाईल कॅमेरा स्थिर केला.
काही वेळानंतर ते घटनास्थळी आले असता मृत शेळी गायब झाल्याचे दिसले. म्हणून त्यांनी मोबाईलचे रेकॉर्डिंग तपासले असता बिबट्या मृत शेळी नेत असतानाचे चित्रीकरणात दिसून आले. जनावरांच्या कळपावर बिबट्याने भरदिवसा हल्ला केल्याचे निष्पन्न झाल्याने महिंद परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.