60 वर्षांच्या काळात काँग्रेसने देशाचा काय विकास केला?; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सवाल

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली या 60 वर्षांच्या काळात काँग्रेसने केवळ स्वतःसाठीच राज्य केले, देशाचा काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय, हे कळेल असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे कराड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटवण्यासाठी कोणता कार्यक्रम राबवला. त्यांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या 100 रुपयांसाठी त्यांना चार वेळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मात्र, त्यांच्या हातात केवळ 20 रुपयेच पडायचे. उरलेले 80 रुपये काँग्रेसचे दलाल खात होते. मोदींनी जनधन योजना, मोफत धान्य, किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, किसान डेबिट कार्ड, सॉईल हेल्थ कार्ड, उज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन आदींच्या माध्यमातून गरीब कल्याण, तसेच महिला सशक्तिकरण आणि युवकांसाठी उद्योग व रोजगार निर्मिती केली.

याउलट काँग्रेसने आतापर्यंत सर्वांना हात दाखविण्याचेच काम केले. त्यांनी कोणाच्याही हाताला काम दिले नाही. मोदींनी स्वच्छ भारत अभियान राबवले. ‘आयुष्यमान भारत’च्या माध्यमातून लोकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले. 2014 पूर्वीपर्यंत काँग्रेसच्या काळात आपल्याला किती आरोग्य सुविधा मिळाल्या, याचाही लोकांनी विचार करावा.

पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणती शाश्वत विकासकामे केली ती सांगावीत.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणती शाश्वत विकासकामे केली, ती सांगावीत. 2014 ते 2024 पर्यंत भाजपच्या काळात कोणकोणती विकासकामे झाली, ती मी पुराव्यांनिशी दाखवतो. त्यांना कोणतेही ठोस शाश्वत काम करता आले नाही. त्यांच्या काळातील एकही प्रकल्प पूर्णत्वास केलेला नाही. त्यांचे आता वय झाले आहे. त्यांच्यासारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कराड दक्षिणच्या जनतेने रिटायर करून डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण, तडफदार, विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा विकास रोखला, असा आरोप करत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, 2019 मध्ये महाराष्ट्रात भाजप – शिवसेनेने हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, यश मिळवले. परंतु, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम आडवे आले. त्यांनी पुत्रासाठी युतीधर्म तोडून महाराष्ट्राचा विश्वासघात केला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धाडसी पाऊल उचलत महाराष्ट्राचे विकासाला गती दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.