Go Karting : रेसिंग जिवावर बेतले; ओढणीचा फास लागून मुंबईतील पर्यटक महिलेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा (Go Karting) : महाबळेश्वरला पर्यटनासाठी आल्यानंतर गो-कार्ट रेसिंग करणे महिलेच्या जीवावर बेतले आहे. महाबळेश्वर येथील गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना वाहनाच्या चाकात ओढणी अडकून गळफास लागल्याने पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. सना अमीर पेटीवाला (वय २४, रा. मिरा रोड, मुंबई), असे मृत महिलेचे नाव आहे.

चाकात ओढणी अडकल्याने गळ्याला फास

मुंबईतील मिरा रोडची रहिवासी असलेली सना अमीर पेटीवाला ही महिला पर्यटनासाठी महाबळेश्वला आली होती. गो-कार्टिंग रेसिंगवेळी ट्रॅकवर बुक कटिंग हा भरधाव गाडी चालविण्याचा साहसी प्रकार करताना महिलेची ओढणी गाडीच्या चाकात अडकली. त्यात ओढणीचा गळ्याला फास लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

पर्यटकांनी जीवघेणे धाडस करू नये

महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील नाकीदा येथे एका गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून महाबळेश्वर पोलीस तपास करत आहेत. पर्यटकांनी जीवावर बेतणारे खेळ अथवा दरींत उतरण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.