कराड प्रतिनिधी । कराड शहरानजीक मलकापुरात प्रियकराने प्रियसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे बुधवारी समोर आली आहे. आरोशी मिश्रा (वय २१) असे तरुणीचे नाव असून तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी ध्रृव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
याप्रकरणी दिप्ती सिंग (वय- 48, रा. झुरण छपरा रोड नंबर 3, मुजफ्फरनगर एमआयटी मुजफ्फरनगर बिहार) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियकर आणि प्रियसी कराड शहरानजीक असलेल्या मलकापूर येथील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. प्रियसी आरोशी आणि ध्रृव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते. तेंव्हापासून या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. त्यानंतर त्यांनी एकत्रच कराडातील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ध्रुव राजेशकुमार छिक्कारा (वय- 21, रा. हाऊस नंबर 684, गल्ली नंबर एक, अशोक विहार गोहाना रोड सोनीपत, हरियाणा) हा कृष्णा मेडीकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डींगमध्ये राहत होता.
ध्रृवने आरोशीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. “तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबध आहेत,” असे म्हटल्यानंतर प्रियकर ध्रृव आणि आरोशी या दोघांच्यात सुरुवातीला वादावादी झाली. त्यानंतर प्रियकर ध्रृव आणि आरोशी यांच्यात झटपट झाली. या झटापटीत दुसऱ्या मजल्यावरुन ध्रुवने धक्का दिल्याने आरोशी खाली पडली व तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्या दोघांच्यात झालेल्या झटापटीत ध्रृवही जखमी झाला.
त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री उशीरा या आरोशीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री १०३ (१) प्रमाणे ध्रृववर या प्रकरणी १ ऑगस्ट पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ध्रृव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील करीत आहेत.