सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे एका आले व्यापाऱ्याने कृषी सेवा केंद्र चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. सुमारे यात चालक जखमी झाला आहे. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरीनाथ नारायण गायकवाड (वय ४८) असे जखमी चालकाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरीनाथ नारायण गायकवाड (वय ४८) यांचे वाठार किरोली येथे कृषी सेवा केंद्र आहे. त्यावेळी श्रीकांत माळी (रा. शैला आर्वी) हा आले व्यापारी हातात कोयता घेऊन दुकानात शिरला. त्याने ‘मला आले देऊ नका, असे तू लोकांना का सांगतोय, माझे नुकसान करत आहेस, तुला जिवंत ठेवणार नाही,’ असे म्हणत हातातील कोयत्याने गायकवाड यांच्या डोक्यात वार केला, यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, शेजारील दुकानदार अनिकेतन जाधव व गणेश चव्हाण यांनी धाव घेतली. त्यानंतर श्रीकांत माळी पळून गेला. त्यानंतर गायकवाड यांना उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात श्रीकांत माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश कड करीत आहेत.