सरपंच, उपसरपंच यांच्या गटात हाणामारी; उंब्रज पोलीस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उंब्रज । सरपंच आणि उपसरपंच यांच्या गटात हाणामारी होऊन २० जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. घोट तालुका पाटण येथील उपसरपंच यांनी कोर्टात दावा दाखल केला. सरपंच यांनी गावातील अतिक्रमणासंदर्भात तारळी नदीत जलसमर्पण करणार असल्याच्या अर्जावरून दोन गटात लाकडी दांडके, दगडाने हाणामारी झाल्याची घटना घडली.

याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सरपंच गौरी विक्रम सोनावणे राहणार घोट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तुम्ही कोर्टात दावा दाखल केला असे म्हणून पांडुरंग बळी सोनावणे, संजयकुमार पांडुरंग सोनावणे, गणेश सोनावले, दीपक सोनावले, अजय सोनावले यांनी फिर्यादी तसेच चुलत सासरे दत्तात्रय सोनावणे व आकाश सोनावले यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यादरम्यान अजय सोनावले यांनी फिर्यादी यांचे चुलत सासरे यांना लाकडी काठीने मारहाण केली. तसेच गणेशराज सोनावले यांनी प्रकाश यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. दिलेल्या फिर्यादीवरून ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर संजयकुमार सोनावले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील लोकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गावातील अतिक्रमणासंदर्भात तारळी नदीत जलसमर्पण करणार असल्याबाबत अर्जाच्या कारणावरून आप्पासो सोनावले यांच्या सांगण्यावरून दत्तात्रय सोनावणे, बजरंग, बाळू , विक्रम, गौरी, शांताबाई, कांताबाई, अवधूत, सुनंदा, महिपती, बापूराव, अनिल यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास स.पो.नि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अनिल पाटील व हवालदार नंदू निकम हे करत आहेत. सरपंच आणि उपसरपंच यांच्या गटातील हाणामारीवरून तालुक्यात खळबळ उडाली आहे.