सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील आदर्श व पाणीदार गाव घाडगेवाडी येथील ग्रामपंचायतीने गावातील सैन्यदलात निवड होणार्या जवानास 25 हजार 551 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. भारतीय सैन्यदलातील स्थलसेना, नौसेना, हवाईसेना यापैकी कोणत्याही सेनेत दाखल होणार्या गावातील तरुणांसाठी हे बक्षीस जाहीर करणारे हे जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे.
घाडगेवाडी गावातील जास्तीत जास्त तरुणांनी देशसेवेसाठी सैन्यदलात भरती व्हावे, गावाचे नाव उज्ज्वल करावे, तरुणांमध्ये देशप्रेम वाढीस लागावे या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
झळा सोसणार्या घाडगेवाडीची विकासात्मक भरारी थक्क करणारी आहे. जिल्हा परिषद, खंडाळा पंचायत समितीचे अधिकारी, एशियन पेंटस, वनराई संस्थेच्या समन्वयातून आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या घाडगेवाडी ग्रामस्थांनी कंबर कसत विकासाला हातभार लावला. सरपंच हिरालाल घाडगे यांनी दूरदृष्टी ठेवत आदर्श गावच्या दिशेनी वाटचाल सुरू केली. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, अर्चना वाघमळे, विश्वास सिद, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे संजय लाड, विस्तार अधिकारी सुनिल बोडरे, ग्रामअधिकारी यशोदा बनकर यांच्या सहकार्यातून गावात विविध योजना, उपक्रम राबवण्यात आले.
त्यामध्ये स्वच्छता व जलसमृद्धीच्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात आले. जलतारा प्रकल्प अंतर्गत 430 जलतारे काढून लाखो लिटर पाण्याचे पुनर्भरण केले. जलसाठ्याचे विकेंद्रीकरण, गावातील पाणी गावात – शेतातील पाणी शेतातच मुरवले. माथा ते पायथा असा उपक्रम राबवत लोकसभागातून शाश्वत व ग्रामीण विकास या दृष्टिकोनातून जलसंधारणाची कामे उभारण्यात आली आहेत. वनराई बंधारे शेत बांधबंदिस्ती, अनगड व दगडी बांध, गॅबियन बंधारे, मातीनाला बांध सिमेंटचे नालाबांध छतावरील पाण्याचे संकलन, मातीनाला बांध दुरुस्ती, तृण बिजारोपण, वृक्षारोपण फळझाडे लागवड, दहा हेक्टरवर बांबू लागवड तर जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा विहीर व पाण्याची टाकी, पंपिंग मशीन दाबनलिका, वितरण व्यवस्था यासह दोन वर्षात जलसंधारणाच्या कामामुळे पाणी पातळीत 30 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे किमान दोन ते अडीच महिने टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावची टॅकरची वर्षाला सव्वा लाख रुपयांची बचत होत आहे.