सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वाई न्यायालयात कळंबा कारागृहातून आणलेल्या कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे या आरोपींवर पूर्ववैमान्यातून गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर वाई शहरात एकच खळबळ उडाली आहे तर घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. वाई न्यायालय परिसरातच कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला असून फिर्यादीनेच गोळीबार केल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी फिर्यादी चंद्रकांत नवघणे यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाई-मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, (रा. भुईंज) आणि निखिल तसेच अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांना आज वाई पोलिसांकडून दुपारी न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले होते. यावेळी न्यायालय परिसरात त्यांच्या दिशेने संशयिताने अचानकपणे दोन राउंड फायर केले.
या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर वाई न्यायालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर तत्काळ वाई पोलीस न्यायालय परिसरात दाखल झाले. त्यांच्यानंतर एलसीबीचे पथक देखील घटनास्थळी दाखल होत या पथकाने एका संशयितांस ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास हा वाई पोलिसांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात 19 ऑगस्ट पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू
सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 2014 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार 19 ऑगस्ट 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.