निवडणूक निरीक्षक गीता ए. यांची कराड दक्षिणेतील मतदान केंद्रांसह शेणोली चेकपोस्टला भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २० रोजी होत असून त्या अनुषंगाने बुधवारी भारतीय निवडणूक आयोगातर्फे नियुक्त निवडणूक निरीक्षक गीता ए. व त्यांच्या पथकाने खोडशी, जखिणवाडी, कार्वे, वडगाव (ह), शेरे व शेणोली इत्यादी मतदान केंद्राना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था निवडणूक पोलीस निरीक्षक पवन कुमार यांच्या समवेत सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या शेणोली चेकपोस्टला भेट दिली.

या दरम्यान त्यांनी मतदान केंद्रांचे नियोजनानुसार असणारे स्थान, रचना, आवश्यक वीज, पाणी, स्वच्छतागृहे, दिव्यांगासाठी रॅम्प, फर्निचर, सुरक्षा, निवारा केंद्र तसेच केंद्राभोवती असणारी उपलब्ध मोकळी जागा इ. सोयी-सुविधा व इतर आवश्यक बाबींची पूर्तता याबाबत तपासणी केली. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान केंद्रावर आवश्यक सर्व बाबी उपलब्ध असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त करून आवश्यकता त्या सूचना केल्या.

यावेळी निवडणूक निरीक्षक गीता ए. व निवडणूक पोलीस निरीक्षक पवन कुमार यांनी येणाऱ्या वाहनांची तेथील कर्मचाऱ्यांसमवेत तपासणी केली व त्याठिकाणी निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी कराड येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन पाहणी केली. समाधान व्यक्त करून काही सूचना केल्या.

मतदान केंद्रांच्या भेटीदरम्यान 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, नायब तहसीलदार युवराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेले शेणोलीचे मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, कराडचे मंडलाधिकारी व्ही. बी. पेंडोसे, खोडशीचे तलाठी अमोल चव्हाण, शेणोलीच्या तलाठी वृषाली सपकाळ, वडगाव हवेलीच्या तलाठी नीलम माने, कार्वेच्या तलाठी नीता पवार, जखिणवाडीच्या तलाठी कानकेकर यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी निवडणूक निरीक्षक गीता ए. यांना मतदान केंद्रनिहाय असणाऱ्या मतदारसंख्या याबाबत माहिती दिली.