कराड प्रतिनिधी । राज्यामध्ये जीबीएस म्हणजेच गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना सातारा जिल्ह्यातही या आजाराचे संशयित रुग्ण आढळले होते. दरम्यान, जिल्ह्यात जीबीएस रुग्णांची स्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत सहा जण समोर आलेले आहेत. त्यातील तिघांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात सोयींनी युक्त आठ खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३०) रोजी प्रथम जीबीएस आजाराचे चार रुग्ण आढळून आले. रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाने अलर्ट राहून विविध उपाययोजना सुरू केल्या. रुग्ण तपासणीचा तत्काळ सर्व्हे करण्याचे काम सुरू केले. पण, आतापर्यंत जिल्ह्यात सहाच रुग्ण स्पष्ट झाले आहेत.
सध्या जीबीएसच्या तीन रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चांगली आहे. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सोयींनी युक्त अशा ८ खाटा राखीव ठेवल्या आहेत. तसेच रुग्णावर उपचार जलद होण्यासाठी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे २२ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे पथक पाठविण्यात येणार आहे.
‘ही’ आहेत जीबीएसची लक्षणं
जीबीएस म्हणजेच गुलियन बॅरी सिंड्रोमची लक्षणे गंभीर आहेत. पुण्यात या आजाराच्या रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. अचानक हातपाय लुळे पडले असतील, तर शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी केले आहे.