सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील आसूत येथे जीबीएस आजाराचा रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुरुवारी आमदार सचिन पाटील यांनी गावात भेट देऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या.
सध्या फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये जुलाब व उलट्याची साथ असून, स्वच्छता आणि पाण्याबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. येथील एका मुलास जीबीएस विषाणूची लागण झाली असून, याच्या कुटुंबीयांची आमदार पाटील यांनी आज भेट घेतली, तसेच गावातील पशुवैद्यकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातील गटार, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था, स्वच्छता, तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री. कुंभार, तालुका आरोग्य अधिकारी श्री. दिघे, भाजपचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, विशाल माने, अमोल लवळे, आसूचे ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.