सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अतीत येथील बसस्थानकासमोर नागठाणे – पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एका गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या नॉबमधून अचानक गॅस गळती सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. आज दुपारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच गॅस गळती रोखल्याने पुढील अनर्थ टाळला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १८ रोजी साडेबाराच्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून गॅस वाहतुक करणारा टॅंकर (केए ०१ एएच ०४१०) कराड बाजूकडे निघाला होता. तो अतीत बसस्थानकासमोर आला. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या गतीरोधकावर बंद पडला. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक खोळंबली. याबाबत नागरिकांनी ११२ नंबरवर फळ करून टँकरबाबत बाेरगाव पोलीस ठाण्यास माहिती दिली. तो पर्यंत वाहतूक खोळंबल्याने टॅंकर मार्गातून हटवण्यासाठी हायड्रा क्रेन महामार्ग ठेकेदाराने पाठवली. त्या क्रेनने टॅंकर बाजूला करताना टॅंकरच्या नॉबची बाजू क्रेनवर आदळली. त्यामुळे त्या नॉबमधून गॅसची गळती सुरू झाली.
घटनास्थळावर पोलीस कॉन्स्टेबल सतिश पवार दाखल झाले. त्यांनी पाहणी करून पोलीस ठाण्यास माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि तेलतुंबडे, पीएसआय स्मिता पाटील, राजाराम निकम व कर्मचारी, जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काळजीपूर्वक टॅंकर बसस्थानकासमोरील मैदानात नेला व वाहतुक सुरळीत केली. दुर्घटना होऊ नये यासाठी परिसरातील नागरिकांना योग्य त्या सूचनाही केल्या.