सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील दर्ग्यात ‘गणपती बाप्पा मोरया’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात हिंदू व मुस्लिम या दोन धर्मातील सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील. त्यातील एक म्हणजे सुमारे 350 वर्षांपूर्वीच्या खटाव तालुक्यातील खातगुण या गावात असलेल्या दर्ग्याच्या आवारातच गेल्या 45 वर्षपासून विघ्नहर्ता गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खातगुण हे हिंदू-मुस्लीम समाजाची संस्कृती व सलोखा मिळून मिसळून जोपासणारे गाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणजे सुमारे 350 वर्षपासून या गावात असलेल्या पीरसाहेब राजेबागसार दर्ग्यातील कबरीचा मुस्लीम इतकाच हिंदू समाज ही मोठा भाविक वर्ग आहे. या दर्ग्यात नगऱ्यासह दररोज होणाऱ्या आरतीला हिंदू मुस्लिम समाज एकत्रित उपस्थित असतो.

मुस्लिम समाजाचे विविध कार्यक्रम, हिंदूंचे कीर्तन, भजन सारखे कार्यक्रम ही याच दर्ग्यात हिंदू -मुस्लिम बांधव मिळून मिसळून साजरे करतात. यंदाही सुंदर सुबक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष ओंकार लावंड, अक्षय लावंड, प्रणव लावंड, शिवम जाधव, रशीद आतार, परवेझ आतार यांच्यासह अनेक हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्रितपणे दहा दिवस गणेशोत्सव साजरा करत आहेत.

पोलिसांनी दोन्ही समाज बांधवांच्या केले अभिनंदन

खातगुण येथील या मंडळास नुकतीच पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पोलीस हवालदार सुधाकर भोसले, पोलीस कर्मचारी खाडे व बकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दोन्ही समाजातील लोकांचे अभिनंदन केले आहे. इतर गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी खातगुण ग्रामस्थांचा आदर्श घेऊन आपापल्या गावात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी एकत्र येवून प्रयत्नशील राहण्याचे आवाहन कांबळे यांनी केले.