सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहित घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. या आचारसंहितेपूर्वी सातारा जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत २१ उपद्रवी टोळ्यांमधील ८६ जणांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तर आता दीडशेहून अधिक गुंडांना जिल्ह्यातून २ महिन्यांसाठी हद्दपार केले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीची तयारी पोलिस तसेच निवडणूक विभागाकडून गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा तसेच तालुकावार निवडणूकपूर्व प्रशिक्षण देखील घेतले आहे. तर आचारसंहितेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे.
सातारा जिल्ह्यात संवेदनशील मतदार संघाची माहिती घेत त्या-त्या मतदारसंघात कोणते यादीवरील गुंड आहेत. याची माहिती पोलीस प्रशासनकडे आहे. त्याचे अपडेटीकरण करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. जिल्हा पातळीवर असलेल्या वरिष्ठ कार्यालयाकड़ून जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तसेच विभागीय पातळीवर असलेल्या पोलिस ठाण्यातून ही माहिती मागविली जात आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने संबंधित गुंडांवर मतमोजणी होईपर्यंत हद्दपारिची कारवाई केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस दल ही विशेष खबरदारी घेत आहे. इतर गुन्ह्यातील गुंड, दरोडेखोर, मारामारी करणारे तसेच टोळीने दहशत पसरविणाऱ्या गुंडांना यापूर्वीच सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे उरलेल्या जवळपास दीडशे गुंडांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांचे युद्ध पातळीवर सुरू आहे.
कराड, पाटण, सातारा, फलटण या तालुक्यात सर्वाधिक गुंडांची संख्या आहे. यातील काही गुंड काही राजकीय नेत्यांच्या जवळचे, कार्यकर्ते म्हणून मिरविणारे असल्याचे बोलले जात आहे. अशा गुंडांचीही यादी पोलिसांकडून सध्या तयार केली जात आहेत.
आत्तापर्यंत 21 उपद्रवी टोळ्या हद्दपार….
सातारा जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पासून ते आता मार्च २०२४ पर्यटन दीड वर्षात २१ उपद्रवी टोळ्यांमधील ८६ जणांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये अनेक नामचिन गुंडांचा देखील समावेश आहे.
कराड पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी राबविले कोंबिंग ऑपरेशन
निवडणुक पुर्व कालावधीत कराड पोलीस उपविभागाकडुन कराड शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवित 37 माहीतगार गुन्हेगारांच्या हालचाली पडताळल्या होत्या. तसेच नाकाबंदी करुन 244 वाहने चेक करुन 10 संशयीत वाहने ताब्यात घेतली. 04 माहीतगार गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली होती. यामध्ये 37 माहितगार व काही तडीपार गुन्हेगार चेक केले. संशयीत 03 लोकांवर सीआरपीसी 110 प्रमाणे कारवाई केली. यामध्ये भटक्या टोळया 04 चेक केल्या, नाकाबंदी पॉईन्ट 02 नेमले होते त्यामध्ये 244 वाहने तपासली, 14 संशयीत वाहने ताब्यात घेतली असुन 92 केसेस करीत 70 हजार रुपये दंड वसुल केला.