कराड प्रतिनिधी । विद्यानगर सैदापूर परीसरात धारधार शस्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या गुंडास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कुंदन जालिंदर कराडकर (रा. गजानन हौसिंग सोसायटी), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
कराड शहरालगतच्या विद्यानगर – सैदापूर उपनगरात एकजण हातात धारधार शत्र घेऊन दहशत माजवत आहे. व्यावसायिकांना धमकावुन खंडणी मागत असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक पतंग पाटील यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पतंग पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सराईत आरोपी कुंदन जालिंदर कराडकर यास धारधार शस्रासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपीवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयिताकडू धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कोणीही अशा प्रकारे दहशत निर्माण करून खंडणी मागत असल्यास शहर पोलीस ठाण्यात माहिती द्यावी , असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी केले आहे.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.