कराड प्रतिनिधी । जीवन सुंदर व्हावे यासाठी निश्चित असा कोणताही फॉर्म्युला नाही; परंतु आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन नक्कीच सुंदर बनते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. कृष्णा सरिता महिला बझारच्यावतीने कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
कृष्णा परिवाराच्या आधारस्तंभ स्व. श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांची ९१ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आली. यानिमित्त कृष्णा सरिता महिला बझारच्यावतीने सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे (पुणे) यांचे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. शिंदे यांनी आपल्या व्याख्यानातून तब्बल दीड तास जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवित, आपल्या अमृतवाणीने उपस्थितांना खिळवून ठेवले.
व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सौ. रंजना मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, श्री. पृथ्वीराज भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, तिलोत्तमा मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले उपस्थित होते.
‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर विवेचन करताना शिंदे म्हणाले, माणूस कसा जगला आणि समाजासाठी त्याने काय योगदान दिले यावर त्याच्या जीवनाची सुंदरता ठरते. आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावे, असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात; परंतु आपण भौतिक साधनांमध्ये सुख शोधतो. सौंदर्य प्रसाधने, मोठा पगार, मोठा बंगला म्हणजे सुंदर जगणे नाही. आईच्या स्पर्शापेक्षा लहान मूल मोबाईलच्या सान्निध्यात शांत राहते, हा मातृत्वाचा पराजय आहे. प्रेम आणि वात्सल्य संपले की आपण यंत्र बनतो. आपल्याला माणूस बनायचे आहे की यंत्र, हे आता प्रत्येकाने ठरविले पाहिजे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, सुख, दुःख, जय, पराजय, संघर्ष, समस्या, अडचणी हे सगळे मानवी आयुष्यात आहे, म्हणूनच जीवन सुंदर आहे. अपयशाने खचून जाणे आणि आत्महत्या करणे हा जीवनाचा अर्थच नाही. स्वत: आनंदी राहायचे असेल तर दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या आजींसोबतच्या आठवणींना उजाळा देत निवडक आठवणी सांगितल्या. आजींनी लहानपणापासून कुटुंबाला केंद्रबिंदू मानून काम केले. आप्पांना प्रत्येक प्रसंगात नेहमी पाठबळ दिले.
या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड मोठी उपस्थिती लावली होती. प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते यांनी प्रास्तविक केले. डॉ. स्वाती इंगळे व सौ. अनघा कट्टे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी आभार मानले.