सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यासह वाई तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर कायम असल्यामुळे मंगळवारी दुपारी धोम धरणामधून 2 हजार 600 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. यामुळे कृष्णेला पूर आला असून, वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला.
अनेक मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धोम धरण 84 टक्के भरले आहे. बलकवडी धरण 85 टक्के भरल्याने बलकवडीतून धोममध्ये 3 हजार 400 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धोम धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, धोम धरणही 84 टक्के भरले आहे. मंगळवारी धरणाचे दोन दरवाजे 1.5 फुटांपर्यंत उघडून पाणी सोडण्यात आले. यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून पाऊस न थांबल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नागेवाडी धरणक्षेत्रातसुद्धा समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हेेही धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, धोम धरण भरल्याने वाईचा पाणीप्रश्न आता संपुष्टात आला आहे.