सातारा प्रतिनिधी | ईव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने साताऱ्यात मंगळवारी माजी आमदार, ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली मतदान यंत्राची जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’चा नारा दिला.
राजवाडा येथून मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा जिल्हाधकारी कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलकांसमोर बोलताना माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले, कोणतेही बटण दाबले की मत कमळाला जाते, त्यामुळे हे ‘ईव्हीएम’ मशीन बोगस असून ते हॅक होत असल्याचे सिद्ध करून दाखवण्यात आले आहे. या यंत्राच्या माध्यमातून मोदी सरकार गेली १० वर्षे जनतेच्या मतांची चोरी करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
जनतेचा आता मतदान यंत्रावर विश्वास राहिलेला नाही. कारण, १८ लाख ९४ हजार मशीन गायब आहेत तर १७ लाख ६ हजार मशीन खराब आहेत. या गायब आणि खराब मशीनबाबत निवडणूक आयोगही बोलत नाही, असे सांगत ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’चा नारा लक्ष्मण माने यांनी दिला. आगामी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली.
अनेक पक्ष, संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा
मतदान यंत्रांची अंत्ययात्रा काढून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी साताऱ्याती परिवर्तनवादी संघटनांनी केली. त्याला राष्ट्रीय काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला. ईव्हीएम हटाव आंदोलन शांततेत पार पडले.