तीर्थक्षेत्र विकासांच्या 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी; सातारा जिल्ह्यात ‘या’ ठिकाणांच्या कामास अतिरिक्त निधीस मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय शिखर समितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी देण्यात आली असून या आराखड्यात सातारा जिल्ह्यातील काही तीर्थस्थळ व ठिकाणांचा समावेश आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार सरोज अहिरे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते. जळगांव, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कोयना जलाशय मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधासाठी 47 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली. हे सर्व प्रस्ताव पर्यटन विभागाने सादर केले.

याशिवाय मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जीवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील केंडबे येथील मुळगांवी स्मारक उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीसाठी बैठकीत मान्यता देण्यात आली.