कराड प्रतिनिधी | कराडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भुयारी गटार योजना (मलनिःसारण प्रकल्प) व शहरासह वाढीव भागाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६० कोटींचा निधी राज्य नगरोत्थान महाभियानमधून मंजूर केला आहे.
तसेच जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांमधून ४९ कोटी, असा असा एकूण २०९ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात यशवंत विकास आघाडी तथा शिवसेनेचे (शिंदे गट) नेते माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना यश आलं आहे.
राजेंद्रसिंह यादवांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्याची कृतिशील साथ
कराड शहराची २०५६ सालापर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून मंजूर झालेल्या निधीतून दोन्ही योजनांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे दोन प्रश्न मार्गी लागण्यासाठी राजेंद्रसिंह यादव यांनी अथक प्रयत्न केले. त्याला मुख्यमंत्र्यांची कृतशील साथ लाभली. याबद्दल कराडकर नागरीकांनी मुख्यमंत्र्यांसह राजेंद्रसिंह यादव यांचे आभार मानले आहेत.
कराडच्या नागरीकरणास येणार वेग
दीड वर्षापूर्वी राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह यादव यांना कराडच्या विकासासाठी १०० कोटीहून अधिक निधी देऊ, असे जाहीर आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर करत आश्वासनाची पूर्तता केली आहे. यशवंत विकास आघाडीचे माजी नगरसेवक, नगरपालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने राजेंद्रसिंह यादव यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे व संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नांना यश आलं. भुयारी गटर आणि पाणी पुरवठा या दोन्ही योजनांच्या अद्ययावतीकरणामुळे कराडच्या नागरीकरणास वेग येणार आहे.
हद्दवाढ भागात नवीन नलिका टाकणार
कराडची भुयारी गटार योजना सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची आहे. या योजनेमुळे कराड नगरपालिकेचा राज्यात लौकिक आहे. परंतु, पन्नास वर्षांचा कालावधी लोटल्याने योजनेच्या अनेक पाईप झिजल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेचे अद्यावतीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. या पार्श्वभूमीवर हद्दवाढ भागात नव्या नलिका टाकण्यात येणार आहेत. तसेच वभूमाव शहरातील ड्रेनेज पंपिंग स्टेशनचेही अद्ययावतीकरण होणार आहे.
पुढील ३२ वर्षांतील लोकसंख्या गृहीत धरून अद्ययावतीकरण
शहराची २४ तास पाणीपुरवठा योजना अद्याप सुरू झालेली नाही. जुन्या पाण्याच्या टाक्यांसह नवीन टाक्या बांधून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र २०५६ सालापर्यंत कराड शहराची लोकसंख्या तीन लाखापर्यंत जाण्याचा अंदाज असून या लोकसंख्येला मुबलक पुरेल इतका पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी ६३ कोटी ४८ लाख रुपये तर जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांतून सुमारे ४९ कोटी रुपये निधीही राजेंद्रसिंह यादव यांनी खेचून आणला आहे.
राजेंद्रसिंह यादवांचा मास्टर स्ट्रोक
यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून विकासकामांचे प्रस्ताव घेवून त्यांचा मंत्रालयात पाठपुरावा सुरू होता. कराड पालिकेच्या इतिहासात २०९ कोटींची एकावेळी तरतूद होणे, ही पहिलीच घटना आहे. या माध्यमातून माजी उपनगराध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधी आणत मास्टर स्ट्रोक मारला आहे.