सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटक चांगलीच गर्दी करत आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक या याठिकाणी येत आहेत. दरम्यान, या ठिकाणी मुख्य बाजारपेठतून एका महाकाय रानगव्याने फेरफटका मारल्याचे दिसून आले. मुख्य नेताजी सुभाषचंद्र भोस चौकामधून आलेला रानगवा हा मुख्य बाजारपेठ मार्गे छ. शिवाजी चौक येथून आराम खिंड परिसरातून नैसर्गिक अधिवासात निघून गेला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या रानगव्यांचा मुक्त संचार काही स्थानिकांनी पाहिला असून प्रसिद्ध विल्सन पॉईंट येथे देखील रानगव्यांचा कळप सूर्यास्तावेळी स्थानिकांना पाहायला मिळाला.
महाड नाका-हिरडा नाका लॉडविक पॉईंट आदी परिसरात सुमारे दहा ते पंधरा गव्यांचा कळप पाहावयास मिळतो. शिवाय महाबळेश्वर व परिसरात रानगव्याची संख्या मोठी असून गावालगत असलेल्या जंगल व परिसरात रानगव्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. दरवर्षी अनेक गावांमध्ये रानगव्यांच्या उपद्रवामुळे शेतीनुकसानीची प्रकार समोर येतात. येथील काही प्रेक्षणीय स्थळांसह रहदारीच्या रस्त्यांवर देखील अनेकवेळा रानगव्यांचा मुक्तसंचार हमखास पाहावयास मिळतो. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत एक महाकाय रानगवा अवतरला.
हा रानगवा मुख्य नेताजी सुभाषचंद्र भोस चौकातून मुख्य बाजारपेठेत येऊन पोलिस स्थानक परिसरातून श्री हनुमान मंदिर ते थेट छ. शिवाजी चौक परिसरात गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर आराम खिंडीतून नैसर्गिक अधिवासात हा रानगवा निघून गेला. रानगवा बाजारपेठेतून जातानाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काही स्थानिकांनी काढले तर काहींनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधून रानगव्याचा मॉर्निंग वॉकचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केला आहे. दोन वर्षांपूवी देखील आशाचप्रकरे एक महाकाय रानगवा मुख्य बाजारपेठेत अवतरला होता.