कराड प्रतिनिधी । देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेद्वारे कोट्यवधी अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे. हि योजना खरोखरच नागरिकांच्या हिटाची असल्याचे मत डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अभिषेक भोसले यांनी व्यक्त केले.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने बुधवार पेठ येथील कराड नगरपरिषद शाळा क्र 10 मध्ये नुकतेच मोफत लाभार्थी कार्ड नोंदणी अभियान शिबीर घेण्यात आले. यावेळी आरोग्य मित्र म्हणून संभाजी पाटील, कल्पेश सुतार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमेटीचे अध्यक्ष राहुल भोसले, रमेश मोहिते, नितीन शहा, विकी वाघमारे, वैभव आवळे, आनंदकुमार तपासे, समता पर्व कराडचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी अभिषेक भोसले म्हणाले की, 23 सप्टेंबर 2018 रोजी ही योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. यासोबतच रुग्णालयात दाखल केल्यानंतरही पुढील 15 दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे वय आणि संख्या लक्षात घेऊन योजनेचा लाभ मिळतो. यावेळी १७८ नागरिकांनी या शिबिरात सहभागी घेतला.
यामध्ये तुम्हाला एक रुपयाही रोख भरावा लागणार नाही. कारण आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे. कराड येथे या योजनेचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी कराड नगरपरिषद शाळा क्र 10 मध्ये मोफत लाभार्थी कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. कराड येथील शिबिराचा १७८ हुन अधिक नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला आहे. आयुष्यमान भारत कार्ड धारकांना कृष्णा वैद्यकीय रुग्णालय येथे 5 लाखापर्यंत मोफत उपचार दिले जात असल्याचे भोसले यांनी यावेळी म्हंटले.