सातारा प्रतिनिधी | यंदा दमदार सुरू असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पश्चिमेला असलेले उरमोडी धरण अगदी काठोकाठ म्हणजे १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून गुरुवारी चौथ्यांदा विसर्ग करण्यात आला. यंदा आतापर्यंत तब्बल २.६० टीएमसी पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले असून हा उच्चांक ठरला आहे.
पश्चिमेकडे परळी खोऱ्यात यंदा जोरदार पाऊस कोसळला असून अद्याप पावसाची बरसात कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी निर्धारित ठेवण्याकरिता गुरुवारी चौथ्यांदा धरणातून पाणी सोडण्यात आले. सुमारे ७५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यावर्षी आतापर्यंत धरणातून एकूण चार वेळा विसर्ग करण्यात आला असून आजचा गुरुवारचा विसर्ग चौथ्या वेळचा आहे.
सांडव्यातून ३०० क्यूसेक, तर विद्युत गृहातून ४५० क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. अजूनही पाऊस सुरू असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याची आवक बघून विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येईल. उरमोडी प्रकल्पात सद्यस्थितीत ९.९६ टीएमसी इतका पाणीसाठा असून सांडवा माथा पातळी ६८८.०० मी. इतकी आहे. प्रकल्पाच्या दोन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण सुरूच आहे. यावर्षीच्या दमदार पावसामुळे उरमोडी प्रकल्पातून उच्चांकी विसर्ग झाला आहे.