सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सध्या उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून त्याचा अनेक घटकांवर परिणाम होत आहे. सर्वात म्हणजे उन्हाळा सुरू झाला की वाहनांच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होतो, इंजिनमधून धूर निघतो, वाहन बंट पडते अथवा ते पेट घेते, असे प्रकार घडत असतात. सातारा जिल्ह्यात विशेषतः पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात अशा घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गाडी चालवताना सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
अलीकडे अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, अपघाताची कितीतरी कारणे आहेत. तरीदेखील अनेकजण वाहनांसह स्वतःच्या सुरक्षिततेची म्हणावी अशी काळजी घेत नाहीत. वाहन कोणतेही असो, त्याची तिन्ही ऋतूंत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात वाहनांची अधिक काळजी घ्यावी लागते. या दिवसांत टायर फुटणे, कुलंटचा स्फोट होणे, गाडीने अचानक पेट घेणे, गरम होऊन इंजिन बंद पडणे अशा घटना घडत असतात. या घटना रोखण्यासाठी उन्हाळ्यात वाहनांचे ‘आरोग्य’ जपायला हवे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
अजिबात करू नका ‘या’ चुका करू नका…
1) दुपारी बारा ते चार प्रखर ऊन असते. यावेळेत लांब पल्ल्याचा प्रवास करणे,
2) वाहनाचे इंजिन, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, टायर, एसी आदींची तपासणी न करणे.
3) वाहनांच्या रेडिएटरमधील कुलंट वेळच्यावेळी न भरणे.
4) टायरमध्ये साधी व क्षमतेपेक्षा जास्त हवा भरणे,
5) तासनताच रखरखत्या उन्हात वाहने उभी करणे,
ही काळजी घ्याच…
1) आपली दुचाकी अथवा चारचाकी नेहमी सावलीत उभी करा.
2) पेट्रोलची टाकी शक्यतो फुल करू नका.
3) इंजिनमध्ये ऑइल योग्य प्रमाणात आहे की नाही, याची खात्री करा.
4) वाहनांचे एअर फिल्टर वेळेत स्वच्छ करा.
5) टायरमध्ये हवा योग्य प्रमाणातच ठेवा. शक्यतो नायट्रोजन हवा भरा.
6) ब्रेक लायनर वेळोवेळी बदला. गाडीची सव्हिसिंग करून घ्या.
7) गाडी उन्हात उभी करू नका. गाडीतील उष्ण हवा बाहेर गेल्यानंतरच एसी सुरू करा.
उन्हाळ्यात टायर का फुटतात?
उन्हाळ्यात डांबरी रस्ते किंवा सिमेंटचे रस्ते तापलेले असतात. त्यावरून वाहने जाताना वेग जास्त असेल तर अधिक घर्षण होऊन टायरमधील हवादेखील गरम होते. त्यामुळे टायर फुटू शकतात. मोटारींचे टायर हे जवळपास ४० ते ५० हजार किलोमीटर अंतरापर्यंत टिकतात. तसेच टायरची गुणवत्ता, रस्त्यांची स्थिती, हवामान, वाहन चालवण्याची शैली यावरही टायरचे आयुष्मान अवलंबून असते. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खराब किंवा झिजलेले टायर फुटण्याचा धोका अधिक असतो.
टायरमध्ये नायट्रोजन अधिक सुरक्षित
कॉम्प्रेसरमधील हवेपेक्षा नायट्रोजन हवा थंड असते. त्यामुळे वाहन वेगाने आणि जास्त वेळ चालवले तरी टायर गरम होत नाही. परिणामी, टायर फुटण्याचा धोका टळतो त्यामुळे उन्हाळ्यात नायट्रोजन हवेचा वापरकरणे अधिक सोईचे ठरते.
व्हील अलाइनमेंट, टायर रोटेशन महत्त्वाचे
गाडीचे व्हील अलाइनमेंट आणि टायर रोटेशनचे महत्त्व आहे. व्हील अलाइनमेंटमध्ये त्रुटी असल्यास टायर असमानपणे वापरले जाऊन लवकर खराब होतात. हवेचा दाब, टायरची स्थिती, व्हील अलाइनमेंट, रोटेशन याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.