कराड प्रतिनिधी । श्रावण सुरु झाला असून श्रावण (Shravan) महिन्यात धार्मिक पर्यटन स्थळांना (Devotional Tourism) भाविक मोठ्या संख्येने भेटी देतात. अशा भाविक पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा नावीण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. सातारा आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू असून ४२ प्रवासी मिळाल्यास थेट त्यांच्या गावातूनच ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत कराड आगारातून आतापर्यंत एस.टी. (ST) बसेच्या माध्यमातून 4 गावातील भाविकांनी या ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ टूर पॅकेजचा लाभ घेतला आहे.
श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला जाण्याचे नियोजन करतात. त्यासाठी एसटीने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. एस.टी. महामंडळाच्या या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवास आहे. त्यासह माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे.
अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना तसेच 12 वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येते. गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशाप्रकारे सांघिक सहलीचे आयोजन केले जाते. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मारलेश्वर अशा तीर्थक्षेत्र बरोबरच अष्टविनायक, दर गुरुवारी नृसिंहवाडी,औदुबंर दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते. सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतानाच एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे.
‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ चा भाविकांनी लाभ घ्यावा : शर्मिष्ठा पोळ
एसटी महामंडळाच्या या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून प्रवाशांनी या उपक्रमात जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन कराड एसटी आगाराच्या व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ यांनी केले असल्याची माहिती ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
भाविकांना तीर्थस्थळांची सफर घडवली जाणार
ग्रामीण भागातील गरिबांची जीवनवाहिनी, लालपरी अशी ओळख एसटी बसची आहे. सातारा विभागात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहीवडी, वडूज या 11 आगारांत 686 एसटीच्या बसेस असून दररोज 650 बसेस विविध मार्गांवर धावतात. या एसटी बसच्या माध्यमातून श्रावण महिन्यात भाविकांना तीर्थस्थळांची सफर घडवली जाणार आहे.
माफक दरात तीर्थाटन
एस.टी.च्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करता येणार आहे. यासाठीज्यांना कोणाला एकत्रितपणे धार्मिक स्थळांना भेटी यायच्या आहरेत. त्यानाही एक ते दोन दिवस अगोदर एसटी आगाराशी संपर्क करावा, या ठिकाणी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा तसेच यासाठी येणारे शुल्क भरावे लागणार आहे.
‘या’ ठिकाणी देता येणार भेटी
दत्तदर्शन, अक्कलकोट दर्शन, अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, – श्री शिखर शिंगणापूर दर्शन, नारायणपूर दर्शन या ठिकाणी भाविकांना ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा नावीण्यपूर्ण उपक्रम अंतर्गत भेटी देता येणार आहे.
महिलांना अर्धे तिकीट
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट आहे. त्यामुळे या तीर्थाटन योजनेला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील कराड एसटी आगारात हा अभिनव उपक्रम सुरु झाल्यापासून आतापर्यंत कराड तालुक्यातील चार गावांनी लाभ घेतला आहे.
ग्रुप बुकिंगची सोय; गावातूनच बस उपलब्ध
प्रत्येक गावातून महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपसाठी बस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी ४२ आसन क्षमता गरजेची आहे. इतके प्रवासी उपलब्ध झाल्यास थेट त्यांच्या गावातूनच बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.