सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या वसुली विभागाच्या वतीने सध्या थकीत करवसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, मंगळवारी पालिकेच्या पथकाच्या वतीने थकबाकी प्रकरणी शहरातील चार गाळे व दोन मिळकती सील करण्यात आल्या. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कारवाई करण्यात आलेले गाळे वृषाली प्रशांत साळी यांचे शाहू क्रीडा संकुलाबाहेर चार गाळे आहेत. त्यांच्याकडे पालिकेची तब्बल १२ लाख १० हजार ६०५ रुपयांची थकबाकी आहे. नोटीस बजावूनही थकबाकी भरण्याबाबत कोणताच प्रतिसाद न देण्यात आल्याने मंगळवारी पालिकेने नियुक्त केलेल्या पथकाने वृषाली साळी यांचे चार गाळे सील केले. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत कर अधिकारी उमेश महादर, लिपिक राजाराम लगड, मिलिंद सहस्त्रबुद्धे, जगदीश मुळे, उत्तम कोळी, तुषार माहुलकर, तेजस साखरे, रवी भाग्यवंत, गणेश पवार, भारत चौधरी, पीयूष यादव यांनी सहभाग घेतला.
वसुली विभागाकडून दुसरी कारवाई सदर बझार येथे करण्यात आली. प्रमोद सखाराम चक्के यांच्या दोन मिळकतींचा एकूण ९ लाख ८७ हजार ३१६ रुपये कर थकीत आहे. या दोन्ही मिळकती पथकाकडून मंगळवारी सील करण्यात आल्या. या कारवाईत वॉरंट अधिकारी -अतुल दिसले, वरिष्ठ लिपिक गणेश तालीम, अक्षय कोळपे, मुकेश वायदंडे, विजय पवार सहभागी झाले. पालिकेने – थकबाकीदारांवर कारवाई मोहीम तीव्र केली असून संबंधितांनी कारवाई , टाळण्यासाठी कर भरणा वेळेत करावा असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.