कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावल्याप्रकरणी चौघांना शिक्षा व दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या कर्मचाऱ्याला केबिनमध्ये कोंडून केबिनला बाहेरुन कुलूप लावल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी चौघांना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व 5 हजार 200 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अण्णासाहेब नि. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली.

सतीश विष्णू पाटील, सुहास शामराव पाटील, महेशकुमार शिवाजी शिंदे, नीतीराज रामचंद्र जाधव अशी शिक्षा व दंड झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.25 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कराड नगरपरिषद कार्यालयातील नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या केबिन समोर प्रहार संघटनेचे सतीश पाटील, सुहास पाटील, महेशकुमार शिंदे व नीतीराज जाधव हे आले. त्यांनी नगराध्यक्ष कुठे आहेत? आम्हाला तक्रार द्यायचे आहे, असे विचारले. त्यावरुन नगराध्यक्ष बाहेर आहेत असे नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक यांनी सांगितले. त्यानंतरही त्या चौघांनी त्यांचे काही एक न ऐकता नगराध्यक्षांच्या केबिनच्या दरवाजाला कुलूप लावून कार्यालयातील कर्मचारी यशवंत महादेव साळुंखे यांना केबिनमध्ये कोंडून ठेवले.

कर्मचारी करत असलेल्या सरकारी कामकाजात त्यांनी अडथळा निर्माण करत अनाधिकाराने त्यास डांबून ठेवले. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. पी. बाबर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यामध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. एम. व्ही. कुलकर्णी यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. यातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद व सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सतीश पाटील, सुहास पाटील, महेशकुमार शिंदे व नितीन जाधव यांना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व 5 हजार 200 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकिलांना पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. भोसले यांचे सहकार्य लाभले.