सातारा प्रतिनिधी | पकडलेले डंपर सोडविण्यासाठी वडूज (ता. खटाव) तहसील कार्यालयाच्या आवारात ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यामध्ये खटावच्या तहसीलदारांसह दोन तलाठी व एका महसूल सहायकाला सहआरोपी करण्यात आले आहे.
तहसीलदार बाई सर्जेराव माने, औंध तलाठी धनंजय पांडुरंग तडवळेकर व भोसरे (ता. खटाव) येथील तलाठी गणेश मोहन रामजाने व वडूज तहसीलदार कार्यालयातील तत्कालीन महसूल सहायक रवींद्र आनंदा कांबळे अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी वडूज जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या अर्जावरील पुढील सुनावणी चार नोव्हेंबरला होणार आहे. २१ नोव्हेंबर २०२३ मध्ये ही कारवाई झाली होती. तहसीलदार बाई माने यांनी पकडलेले डंपर सोडण्यासाठी वडूज तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक प्रवीण धर्मराज नांगरे यांनी बाई माने व त्यांच्या चालकासाठी ५५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम त्याने त्याच्या कारमध्ये ठेवण्यास सांगितली होती. त्यामुळे लाच स्वीकारल्याप्रकरणी नांगरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानवे- खराडे यांच्याकडे देण्यात आला होता. तपासामध्ये समोर आलेल्या पुराव्यानुसार गुन्ह्यामध्ये कलम वाढवून वरील चार संशयितांना सहआरोपी करण्यात आले आहे.